Posts

कवी कधी होत नसतो म्हातारा... -श्रीराम ग. पचिंद्रे माझ्यासमोर एक गंभीर प्रश्न पडलेला आहे. प्रेमकविता लिहायची असेल, तर कवी तरुणच असला पाहिजे का? तसेच तो सुंदरही असायला हवा का?- हा पश्नच अप्रस्तुत आहे, असं आपण निश्चितच म्हणाल. पण नाही! त्याचं असं झालं की, एका कविसंमेलनाच्या आयोजकांनी फक्त तरुण कवींनाच प्रेमकविता सादर करण्यासाठी आमंत्रित केलं. तरुण श्रोत्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी कवीही तरुण (आणि सुंदर, आकर्षक) हवेत, असं त्यांचं म्हणणं होतं. मग असं असेल तर, आजवर अनेक वयस्कर, प्रौढ, वृद्ध कवींनी लिहिलेल्या विलक्षण तरल, आशयघन, सुंदर कविता मोडीतच काढाव्या लागतील. खरंतर जी उत्कृष्ट कविता आहे, ती चिरतरुण असते. प्रेमकविता तर असतेच असते. ती तरुण कवीनं लिहिलेली असो, की, वृद्ध कवीनं. किंबहुना वृद्ध कवी जी प्रेमकविता लिहितो, ती अधिक प्रगल्भ, परिपक्व असते आणि तीच तरुणांना अधिक आवडते. भा. रा. तांबे यांनी कविता लिहायला सुरुवात केली, तीच मुळी सत्तरीनंतर. पण त्यांनी त्यानंतर लिहिलेली डोळे हे जुल्मी गडे रोखुनि मज पाहू नका जादुगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका ही कविता असो, की, ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे किंवा नववधू प्रिया मी बावरते, लाजते, पुढे सरते, फिरते... किंवा हृदयी माझ्या गुलाब फुलला रंग तुझ्या गालावर खुलला, काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्या उरि कोमल का? कुणि कोडे माझे उकलिल का ही कविता. अशा कविता तांब्यांनी वृद्धापकाळात लिहिलेल्या असून आणि त्यांना आज 70- 75 वर्षे उलटूनही त्यांची गोडी कमी होत नाही, ती कशामुळे? कारण उत्कट प्रेमभावनेचा आविष्कार असलेली त्यांची विशुद्ध प्रेमकविता आजही तितकीच तरुण आणि रसरशीत आहे, म्हणून! त्यामुळे कवीच्या वयाचा, दिसण्याचा आणि त्याच्या प्रेमकवितेचा काहीही संबंध नाही. गझलसम्राट की सुरेश भट यांनी वयाच्या पन्नाशीनंतर लिहिलेली- दूर तारे थरारले होते, मी नको ते विचारले होते... तोल गेला खरा तुझा माझा, चांदण्यानेच भारले होते... सांजवेळीच आलीस कशी? मी पहाटे पुकारले होते... हे त्यांच्या गझलेतील शेर आज ‘तरुण’ राहिलेले नाहीत किंवा कवीच्या वयाएवढे म्हातारे झालेत, असं कोण म्हणेल? आज सुरेश भट असते तर आज नव्वद वर्षांचे असते. पण म्हणून त्यांच्या- मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो तुला न सांगतो तुझा वसंत रोज पाहतो यासारख्या कविताही म्हातार्‍या झाल्या आणि तरुणांना त्या आवडणार नाहीत, असं कुणी म्हणू शकेल का? बा. सी. मर्ढेकर यांच्यासारख्या मराठी नवकवितेच्या प्रवर्तकाने लिहिलेल्या दवांत आलिस भल्या पहाटी शुक्राच्या तोर्‍यात एकदा जवळुनि गेलिस पेरित अपुल्या तरल पावलांमधली शोभा अडलिस आणिक पुढे जराशी पुढे जराशी हसलिस; -मागे वळुनि पाहणे विसरलिस का? यासारख्या ओळी म्हातार्‍या झाल्या, शिळ्या झाल्या असं म्हणायची कुणाची जीभ तरी वळेल का? कामगारांची कविता लिहिणार्‍या नारायण सुर्वे यांच्याही मनात एक हळवा प्रेमिक होता. त्यांनी लिहिलेल्या़- अशी उदास, आकुल, डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको आधीच शरमिंदा झालो आहे; अधिक शरमिंदा करू नको आयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव. ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव. अशा ओळी वाचताना सुर्व्यांचे वय किंवा त्यांचं दिसणं आठवत नाही, तर आठवते ती त्यांची कविता. कवी वयाने कितीही मोठा झाला, तरी त्यांच्या अंतःकरणात प्रेम हे असतेच. म्हणून तर कवि अनिल वृद्ध होऊनही म्हणून गेलेत ...अजून यौवनात मी , मुले , फुले सभोवती विकासती, विलासती हसून हासवित ती प्रलोभनात प्रीतीच्या कुणी हसे झुरे तिथे तिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे.... ---------------------------------------------------------------------------------